Sun. May 19th, 2024

पुणे : स्त्रीवादी चळवळीला पुरूषविरोधी चळवळीचा मुखवटा देऊन नाहक बदनाम करण्याचे काम केले जात आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरूषांविरोधीची चळवळ नसून ही समानतेची लढाई आहे, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि संपादक डॉ. गिताली वि. मं. यांनी व्यक्त केले. 

दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि सुनीता ओगले लिखित ‘सोलमेट’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. 

एस.एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर नाट्य चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखिका सुनीता ओगले आणि दिलीपराज प्रकाशनाच्या मधुमिता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. गिताली वि. मं. म्हणाल्या की, राजसत्ता असो की कुटुंबसत्ता. त्या सत्तेचे विकेंद्रीकरण होणे स्त्रीवादी चळवळीला अपेक्षित आहे. सत्तेच्या या विकेंद्रीकरणासाठी माणसे बौध्दीक, मानसिक आणि भावनिक पातळीवर समृद्ध होणे आवश्यक आहे. लोकशाही आणि संविधान वाटवायचे असेल, तर स्वतःपुरता विचार करून चालणार नाही. परिवर्तनासाठी रस्त्यावर उतरून चळवळी करणे आवश्यक आहे. स्त्री आणि पुरूष शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळे असले तरी त्या वेगळेपणाचे विषमतेमध्ये रूपांतर न होता आपापसात मैत्रभाव जागा होणे आवश्यक आहे. स्त्री चळवळीभोवती नाहक एक चक्रव्यूह गुंफले गेले असून स्त्रीवादी चळवळीतील महिला या स्वैराचारी, उध्दट आणि परंपरेला प्रश्न विचारणाऱ्या अशा दृष्टीकोनातून पाहिले जाते. आजही अनेक महिलांना तुम्ही स्त्रीवादी आहात का, असे विचारले असता आम्ही त्यातल्या नाही, असे म्हणून महिला स्त्रीवादाला बाजूला सारताना दिसतात. पुरूष आणि स्त्री यापैकी समुहातील कोणत्याही घटकाचे शोषण होत असेल, तर तो घटक शोषणमुक्त करणे म्हणजे स्त्रीवादी चळवळ होय. पितृसत्ताक आजही भक्कम आणि रिजीड असून इतक्या वर्षांनतरही ती बदलणे अवघड होत आहे. समाजातील लोकांना शक्यतो बदल नको असतो. स्त्रिया देखील कुटुंबात स्वतःविषयी आत्मवंचनेच्या भूमिकेत जातात. मला वाटते स्त्रियांनी आत्मशोध घेता घेता समाजाचा देखील शोध घेतला पाहिजे. 

यावेळी बोलतना आनंद इंगळे म्हणाले की, चित्रपट आणि साहित्य निर्मिती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही एकटे असलात तरी पुस्तके तुम्हाला सोबत देतात आणि साथ देतात. 

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, भौतिक समृद्धीच्या मागे धावता-धावता नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण झाला असून प्रत्येकाला एका सोलमेटची गरज आहे. एकमेकांमध्ये भावनिक गोफ अपेक्षित असताना मानवी नाते संबंधात भावनिक गुंतागुंतच अधिक वाढत चालली आहे. हरवलेला संवाद आणि दुभंगलेली मने असे चित्र कुटुंबात अलीकडे दिसायला लागले आहे. कोणत्याही कथा संग्रहाचे यश हे कथाबिजामध्ये दडलेले असते. वाचनीयता हा कथासंग्रहाचा सर्वात मोठा गुण असून तो प्राधान्याने असला पाहिजे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराज प्रकाशनाच्या मधुमिता बर्वे यांनी केले. सुनीता ओगले यांनी लेखकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले, तर सई ओगले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘सोलमेट’ या कथासंग्रहातील एका कथेचे अभिवाचन संजय डोळे यांनी केले.  

छायाचित्र ओळीः- दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि सुनीता ओगले लिखित ‘सोलमेट’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे. यावेळी (डावीकडून) मधुमिता बर्वे, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. गिताली वि. मं., आनंद इंगळे आणि सुनीता ओगले.