Sun. May 19th, 2024

पुणे : कट्टर समाजवादी नेत्यांनी त्यांच्या उमेदिच्या काळात लोकशाहिच्या शाश्वत मुल्यांची रुजवाण केली ,  पंरतू लोकशाहिला पूरक आणि सर्वसमावेशक हीच शाश्वत मुल्ये आज संकटात आली असून आपण स्वातंत्र्य भारतात पुन्हा एकदा गुलामगिरी कडे वाटचाल करीत आहोत की अशी शंका येते असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी व्यक्त केले .

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२४’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यावर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना आज भाई वैद्य यांच्या स्मृतीदिनी डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वैद्य बोलत होते. एस.एम.जोशी फौंडेशनच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भाई वैद्य फौंडेशनच्या सचिव  प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, फौऊडेशनच्या विश्वस्त डॉ. प्राची रावळ , डॉ. बाबा आढाव , पुरस्कार्थी आनंद पटवर्धन , डॉ.अभिजित वैद्य ,आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, विश्वस्त डॉ. प्रताप रावळ आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अतुल रुणवाल  आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर याच सभागृहात आनंद पटवर्धन निर्मित-दिग्दर्शित ‘वसुधैव कुटुंबकम’ हा जगभरातील समीक्षकांनी प्रचंड वाखाणलेला नवा माहितीपट दाखवण्यात आला. 

यावेळी बोलताना आनंद पटवर्धन म्हणाले की, भाई सारख्या थोर समाजवादी नेत्यांनी आपल्याला ब्रिटिशां पासून केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर आपणास त्यांनी आपले मूलभूत हक्क मिळवून दिले होते . भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य त्यांच्या मनोगतात म्हणाले , जातिव्यवस्था आणि जमातवादाच्या विरोधी भाई वैद्य यांनी आयुष्यभर लढा दिला. समाजवाद, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ही मूल्ये त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा पाया होता. आज आपल्या देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. धर्माच्या आधारावर यादवी माजवण्याचे नियोजन केले जात आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे . 

यावेळी बोलताना डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, भाईंच्या नावाचा पुरस्कार आणि तो आनंद पटवर्धन यांच्यासारख्या चित्रपटकर्त्याला दिला जाणे या दोनही गोष्टींना सध्याच्या परिस्थितीत फार महत्व आहे. हा पुरस्कार देवून गेली पांच दशके देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर माहितीपट करणाऱ्या या, केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटकर्त्याचा सन्मान करणे ही आमची प्रामाणिक भावना आहे. पण यापेक्षा मला महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही की आनंद पटवर्धन अशा दुर्मिळ चित्रकर्त्यांपैकी एक व्यक्तिमत्व आहेत की जे मूल्यांसाठी जगतात, त्यांच्या कलेतून त्यांची मूल्ये प्रतिबिंबित होतात आणि त्या मूल्यांसाठी ते कोणतीही किंमत मोजायला निर्भयपणे तयार असतात. भाईंचे उभे आयुष्य हे अशाच मूल्यांसाठी समर्पित होते. भाई आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड न करता लढले, त्यासाठी त्यांनी सत्ता लाथाडली, तुरुंगवास भोगला. पण त्यांनी जी मूल्ये उराशी बाळगली तीच त्यांच्या राजकारणातून प्रतिबिंबित होत राहिली. आनंद पटवर्धन यांच्या अनेक कलाकृतींचा हीच मूल्ये गाभा आहेत. त्यामुळे आनंद पटवर्धन यांची प्रत्येक कलाकृती देशाच्या सीमा ओलांडून वैश्विक बनते. देशातील परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कलाकारांवर हल्ले होत आहेत. दुसरीकडे कलाकार सत्ताधाऱ्यांचे लागूंचालन करण्यात धन्यता मानत आहेत. काही कलावंत आणि साहित्यिक हे स्वत: वर्णव्यवस्था आणि जमातवादाचे समर्थन करणारे आहेत. ही सर्व मंडळी आपल्या विषारी तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी मूल्यहीन कलाकृतींना जन्म देत आहेत. देशातील चित्रपटकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांची लाचारी करीत कला गहाण टाकली आहे. या पार्श्वभूमीवर आनंद पटवर्धन या व्यक्तीचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होते. 

भाई वैद्य ही एक वैचारिक शक्ती होती. ते नुसते राजकीय आणि सामाजिक नेते नव्हते तर ते तत्त्वज्ञ होते आणि लढवय्येही होते. आनंद पटवर्धन याच मार्गावर चित्रपट निर्मिती करीत आले आहेत. म्हणूनच लोकनेते भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कारासाठी देशाच्या चित्रपट क्षेत्रातील इतकी योग्य व्यक्ती कोणी असू शकत नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई वैद्य  फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन ममता क्षेमकल्याणी यांनी केले. अतुल रुणवाल यांनी आभार मानले.    

छायाचित्र ओळीः- थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२४’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना प्रदान करताना डॉ.अभिजित वैद्य. यावेळी (डावीकडून) फौऊडेशन च्या विश्वस्त डॉ. प्राची रावळ ,सचिव  प्रा. डॉ. गीतांजली वैद्य,  डॉ. बाबा आढाव ,आनंद पटवर्धन , डॉ. अभिजित वैद्य ,आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, विश्वस्त डॉ. प्रताप रावळ आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अतुल रुणवाल .